Corona Vaccine : पुण्यातील ‘या’ हॉस्पीटलमध्ये पुर्ण झाली रशियाच्या स्पुटनिक 5 लशीची मानवी चाचणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना प्रतिबंधक लस उत्पादनात सर्वच देश लागले असून, काही देशाच्या लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. भारताची लस अंतिम टप्प्याच्या परीक्षणामध्ये आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, रशियातील गमलेया नॅशनल रिसर्च सेंटर आँफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी, रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांच्यातर्फे विकसित करण्यात येत असलेल्या स्पुटनिक ५ या लशीच्या सुरक्षिततेची मानवी चाचणी पुण्यात पूर्ण झाली. पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये १७ स्वयंसेवकांना या अंतर्गत ही लस देण्यात आली.

केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या अहवालानंतर रशियाच्या स्पुटनिक ५ लशीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देशात सुरुवात झाली. लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता यात तपासली जाते. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात लस किती सुरक्षित आहे, याची चाचणी मानवावर केली जाते.

नोबेलमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या
स्पुटनिक-5 लशीच्या चाचणीसाठी १७ निरोगी स्वयंसेवकांची निवड करण्यात आली. त्यांना ही लस देण्याची प्रक्रिया गेल्या तीन दिवसांपासून नोबेल हॉस्पिटलमध्ये सुरू होती. लस निर्माण करण्याच्या दुसऱ्या टप्प्यातील या मानवी चाचण्या होत्या. गेल्या शनिवारी या टप्प्यावरील लसीकरण पूर्ण झाले आहे. ही लस दिल्यानंतर प्रत्येक स्वयंसेवकांना कोणती रिअ‍ॅक्‍शन येत आहे का, हे बारकाईने तपासण्यात आले आहे, अशी माहिती नोबेल हॉस्पिटलमधील क्‍लिनिकल रिसर्चचे प्रमुख डॉ. एस. के. राऊत यांनी दिली. दरम्यान, रशियाच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या केईएम हॉस्पिटलमध्ये होणार आहे. या चाचण्या वढू येथील केंद्रावर केल्या जातील. असे डॉ. आशिष बावडेकर यांनी सांगितले.