परदेशात नोकरीसाठी पाठवल्या जाणार्‍या महिलांचा बाजारात व्हायचा ‘लिलाव’, UP मधील 17 अन् गुजरातच्या एकीला विकले

कानपूर : वृत्तसंस्था –    महिलांना आखाती देशात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून तस्करी करणा-या टोळीतील दोन एजटांना उत्तर प्रदेशच्या कानपूर क्राईम ब्रॅंचने अटक केली आहे. अटक केलेले आरोपी हे दिल्ली, मुंबई, कर्नाटकातील ट्रॅव्हल्स एजन्सीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात या दोन्ही एजंटने 18 महिलांना परदेशात विकल्याचे समोर आले आहे. विकलेल्या महिलांमध्ये उत्तर प्रदेशातील 17 आणि गुजरातच्या एका महिलेचा समावेश आहे.

अतीकउर्र रेहमान आणि मुज्जमिल अशी अटक केलेल्या एजंटची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांना परदेशात चांगली नोकरी देतो असे सांगून व्हिसावर ओमान, सौदी, कतार, कुवेतमध्ये नेऊन विक्री करत होते. तिथे महिलांना डांबून त्यांच्याकडून घरकामे करून घेत असत. तसेच त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. याबाबत कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीने 9 एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. माझ्या पत्नीला आरोपींनी ओमानमधील रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. टुरिस्ट व्हिसावर पत्नीला गेल्या 5 जानेवारी रोजी ओमानला पाठवले. एके दिवशी पत्नीचा फोन आला. मला या ठिकाणी विकले गेले असल्याचे सांगितले. घरातील कामे करण्यापासून शारीरिक शोषणही केले जात असल्याचे तिने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत डीसीपी सलमान ताज पाटील यांनी सांगितले की, कर्नलगंज पोलिसांत दाखल एफआयआरनुसार, तपास सुरू केला. आरोपीने जवळपास 18 महिलांना परदेशात पाठवले आहे. एका महिलेला परदेशात पाठवण्याच्या बदल्यात त्यांना सरासरी 25 ते 30 हजार रुपये मिळतात. आरोपीने चौकशीवेळी सांगितले की, कानपूरच्या 11 उन्नावच्या 6 आणि गुजरातच्या 1 महिलेला आखाती देशांत विविध ठिकाणी पाठवले आहे.