पोलिसांना माणुसकी भोवली ; आरोपीचे हातकडीसह पलायन 

बीड/धारूर : पाेलीसनामा ऑनलाईन- थंडीने काकडून आरोपीने कोठडीत डोळे पांढरे केले. त्याचे बरे वाईट होऊ नये यासाठी पोलिसांनी आरोपीला जेलमधून बाहेर काढले. याच संधीचा फायदा घेऊन आरोपीने पोलिसांना धक्का देऊन हातकडीसह पलायन केले. माणुसकी दाखवायला गेलेल्या पोलिसांना आरोपीला शोधण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागला.

हा प्रकार रविवारी (दि.३०) रात्री एकच्या सुमरास धारुर येथे घडला. आरोपीने डोळे पांढरे केल्यामुळे त्याला दवाखान्यात नेण्यासाठी पोलिसानी दाखवलेली माणुसकी त्यांच्याच अंगलट आल्याने आज दिवसभर याचीच चर्चा परिसरात होती. पोलिसांनी आरोपीला दहा तासाच्या अथक परिश्रमानंतर पुन्हा अटक केली.

धनराज डोंगरे (२५ रा.पिंपरवाडा ता.धारूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने गावातीलच एका अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केला होता. धारूर ठाण्यात ११ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला. त्याला २९ तारखेला अटक केली. न्यायायालने ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. रविवारी रात्री त्याची प्रकृती खालावल्याने त्याला रूग्णालयात नेले. डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे सांगितले. कोठडीत त्याला पांघरूनही दिले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास त्याने डोळे पांढरे करायला सुरूवात केली.

पहारेकरी पोना दिगंबर गिरी यांनी त्याला बाहेर काढले. लॉक लावत असतानाच धनराज त्यांना हिसका देत हातखडीसह पलायन केले. गिरी यांनी इतरांना आवाज देण्यापूर्वीच ताे अंधारातून गायब झाला. रात्रभर धारूर पोलिसांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. सकाळी आसोला येथील नातेवाईकाकडे तो लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे त्याला सापळा लावून सकाळी पुन्हा गजाआड केले. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.