‘जनता कर्फ्यू’त माणुसकीचं दर्शन घडविणाऱ्या पोलिसांच्या मदतीनं महिलेची सुखरूप ‘प्रसूती’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – आज रविवारी जनता कर्फ्यूला हाक देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही हाक दिली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यासहीत संपूर्ण महाराष्ट्रात या कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद जामनेरमध्ये देखील पाहण्यास मिळाला आहे.

जामनेरमध्ये जनता कर्फ्यू दरम्यान एका गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या, मात्र महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध होत नसल्याने महिलेच्या नातेवाईकांनी जामनेर पोलिसांना या घटनेबाबत सांगितले. दरम्यान पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता महिलेचे घर गाठले आणि तिला पोलिस व्हॅनमधून जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान रुग्णालयात या महिलेची डॉक्टरांनी सुखरुप प्रसुती केली. पोलिसांनी ऐनवेळी येऊन या महिलेचे आणि बाळाचे प्राण वाचविले, त्यामुळे माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या या पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून कलम १४४ लागू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या प्राणघातक साथीच्या आजारावर मात करण्यासाठी उद्या सकाळपासून महाराष्ट्रभर कलम १४४ लागू करण्यात येईल.’ मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे उद्या (सोमवार) सकाळपासून महाराष्ट्रातील कोणत्याही भागात ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. ५ पेक्षा जास्त लोक जर एकाच ठिकाणी दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला..

महाराष्ट्राला कोरोना विषाणूने चांगलेच जखडले आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये गेल्या काही तासांत कोरोनाचे नवीन रुग्ण समोर आले आहे. मुबईत ६ तर पुण्यात ४ असे नवीन १० रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दरम्यान आरोग्य विभागाकडून हे रुग्ण कोण आहेत आणि कुठून आलेत याबाबत तपास करण्यात येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे अजून एक ५६ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. हा मृत्यू मुंबई येथे झाला असून राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.