खाकी वर्दीतील ‘माणुसकी’चं दर्शन !

सातारा – पोलीसनामा ऑनलाईन – सध्या पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा मोठा फटका बसला आहे. दळणवळण सुविधा ठप्प झाल्या आहेत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. राष्ट्रीय महामार्गच बंद झाल्याने अनेक वाहने रस्त्यावर आहे त्या ठिकाणी अडकून पडली. दोन दिवस झाले तरी पुराचे पाणी ओसरले नाही. त्यामुळे जवळपास ५ हजार ट्रक रस्त्यावरच अडकून पडले आहेत. या वाहनचालकांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी खाकी वर्दीतील माणूस धावून आला आहे.

महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची नियमितपणे तपासणी करण्याचे काम ट्रॅफिक पोलिसांचे. यामुळे कधी कधी ट्रॅफिक पोलीस आणि वाहनचालकांमध्ये वाद देखील होतात. पण अशा भीषण परिस्थितीत मात्र ट्रॅफिक पोलिसांनी वाहनचालकांच्या जेवणाची सोय केली आहे. पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर हे चित्र पाहायला मिळाले. सातारा पोलिस दलामार्फत या ट्रकवरील लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे, पुन्हा एकदा खाकी वर्दीतली माणूसकी या पुराच्या पाण्यात दिसून आली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या ट्रकजवळ ट्रक चालक जेवताना दिसत आहेत आणि त्यांना खाकी वर्दीतील माणूस जेवण वाढताना दिसत आहे. इतरवेळी ज्या वर्दीचा धाक वाटतो. त्याच वर्दीतल्या माणसाने वाहनचालकांची भागवलेली ही भूक माणुसकीचे दर्शन घडवते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like