हुंडीवाले खून प्रकरण : ‘त्या’ सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यास अटक

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात खून करण्यात आला. हुंडीवाले यांच्या डोक्यात अग्निरोधक सिलिंडर घालून खून करण्यात आला. या प्रकरणातील तीन आरोपी पोलिसांसमोर शरण आले आहेत. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींपैकी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे व धिरज प्रल्हाद गावंडे या तीघांनी मंगळवारी पहाटे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली.

याप्ररणी विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे (रा. खेतान नगर कौलखेड) आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसनराव हुंडीवाले यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वादावर सोमवारी सुनावणी होती. या सुनावणीसाठी हुंडीवाले हे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात आले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. टेबल, खुर्ची आणि लाकडी काठ्यांनी त्यांना मारहाण करत असताना विक्रम गावंडे याने अग्निरोधक सिलिंडर हुंडीवाले याच्या डोक्यात तीनवेळा मारला. यामध्ये गंभीर जखमी होऊन हुंडीवाले यांचा जागीच मृत्यू झाला.

किसनराव हुंडीवाले यांचा मुलगा प्रविण याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शैक्षणिक संस्थेतील वाद तसेच गावंडे यांची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्याने किसनराव हुंडीवाले यांचा खून केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Loading...
You might also like