आखातात नोकरीच्या आमिषाने शेकडो जणांची फसवणुक, टोळी पोलिसांच्या ‘जाळ्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आखाती देशात चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगार तरुणांना हजारो रुपयांना फसविणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या टोळीने महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, गुजरात, ओडिशा आदि राज्यातील शेकडो युवकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथील एका कार्यालयात हा प्रकार सुरु होता. पोलिसांनी येथून लाखो रुपयांसह ७९ पासपोर्ट, ३० जणांचे आखाती देशाच्या व्हिसाच्या फोटोप्रिंट, रबरी शिक्के जप्त केले आहेत.

अक्रम शरीफ शेख (वय ४७, रा़ चिता कॅम्प, ट्रॉम्बे) आणि शाबीर अकबर मास्टर ऊर्फ मुन्ना (वय ५२, रा़ डोंगरी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. धारावीत राहणारे जाहिद खान यांना मुन्ना व शेख यांनी कुवेतमध्ये नोकरी देतो, असे सांगून व्हिसा व अन्य कागदपत्रांसाठी त्यांच्याकडून ७० हजार रुपये घेतले होते.

खान यांनी पैसे दिल्यानंतरही त्यांना कुवेतला पाठविण्यासाठी व नोकरीची माहिती देण्याबाबत ते टाळाटाळ करत होते. शेवटी त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार केली. पोलिसांनी मशीद बंदर रेल्वे स्थानकासमोरील पटवा चेंबर्स येथील कार्यालयावर छापा घातला. तेव्हा तेथे बेरोजगारांची फसवणुक करणाऱ्या टोळीचा छडा लागला. या दोघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यावर ते आखाती देशात नोकरीच्या आमिषाने प्रत्येकाकडून ७० ते ७५ हजार रुपये घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Visit : Policenama.com