शेकडो पोलिस निरीक्षक अजुनही अतिरिक्त; विनावेतन काम करण्याची वेळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – दिवाळीपूर्वीच प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या जवळपास 350 पेक्षा अधिक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी 125 पोलिस निरीक्षकांना अजुनही नियुक्ती मिळाली नाही. अतिरिक्त ठरल्यामुळे अधिकाऱ्यांना विना वेतन काम करावे लागत आहे. त्यामुळे राज्य पोलिस दलात नाराजीचा सूर आहे. गृहमंत्रालय याकडे दुर्लक्ष करत आहे. परिणामी अनेक पोलिस अधिकारी तोंड दाबून बुक्‍क्यांचा मार सहन करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांनाच नियुक्ती मिळाल्याचा आरोप होत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरातील प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेले आणि विनंती बदल्यासाठी अर्ज केलेल्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून सव्वाशेवर पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या सर्वच पोलिस निरीक्षकांना वेतन मिळत नाही. दिवाळीपासून पगार नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घराचे ईएमआय आणि कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांना आटापीटा करावा लागत असल्याची चर्चा आहे.

हा सर्व घोळ पोलिस महासंचालक कार्यलयातीला बाबूगिरीमुळे झाला आहे. पोलिस महासंचालक कार्यालयातील बदल्यांची यादी बनवितांना मंजूर पदे आणि सध्यस्थितीतील पदे याचा तालमेळ घालण्यात आला नाही. विनंती बदली झालेल्यांना लगेच पोस्टींग दिली तर प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्यामुळे बदली झालेल्यांना अजुनही वेटींगवर ठेवले आहे. अनेक पोलिस अधिकारी आर्थिक अडचणीत आले आहे.

त्या अधिकाऱ्यांना पदोन्नती कधी
कोविड काळात अविरत सेवा केल्यामुळे कोरोनायोद्धा म्हणून काम करणारे राज्य पोलिस दलातील अनेक सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. डिसेंबर महिन्यांतच पदोन्नती मिळण्याची शक्यता असताना केवळ डीजी कार्यालयात सुरू असलेल्या घोळामुळे पदोन्नतीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. सध्या एपीआय आणि पीएसआय दर्जाचे अधिकारी पदोन्नतीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्याचे चित्र आहे.