यवतमाळ : अभिमानास्पद ! पाटणबोरीच्या पोरींची गगनभरारी, एकाच वेळी उडविणार शंभर उपग्रह

यवतमाळ (yavatmal ) : पोलीसनामा ऑनलाईन – अंतराळात एखादा उपग्रह प्रक्षेपित करणे आव्हानात्मक काम मानले जाते. मात्र हे आव्हानात्मक काम यवतमाळ (yavatmal ) जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील 30 आदिवासी विद्यार्थिनी करणार आहेत. येत्या 7 फेब्रुवारीला एकाच वेळी शंभर उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम जगात पहिल्यांदाच होणार असून त्याची जागतिक विक्रम म्हणून नोंद होण्याची शक्यता आहे. या उपक्रमाची नोंद घेण्यासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया ग्रुप ऑफ रेकॉर्ड आणि वर्ड बुक ऑफ रेकॉर्डची चमू उपस्थित राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपराष्ट्रपती देखील उपस्थित राहणार आहे.

उपग्रहांचे शतक ठोकणाऱ्या या विद्यार्थिनी यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरातील रहिवासी आहेत. हाऊस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया आणि मार्टीन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अब्दुल कलाम आझाद इंटरनॅशनल फाऊंडेशनने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. डॉ. अब्दुल कलाम आझाद स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चॅलेंज-2021 ग्रह असे या मोहिमेचे नाव आहे. उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला होता. यात देशभरातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार असून त्यात महाराष्ट्रातील 100 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या शंभर जणांपैकी 30 जण एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्याहून अभिमानास्पद बाब म्हणजे या 30 जणांपैकी 24 खेड्यापाड्यातील आदिवासी मुली आहेत. त्या सर्व पाटणबोरी येथील रेड्डीज् कॉन्व्हेन्ट व कॉलेजमध्ये नामांकित इंग्रजी शाळेत निवासी शिक्षण घेत आहे.

निवड झाल्याबाबत फाऊंडेशनने रेड्डीज्‌ कॉन्व्हेन्टला पत्र पाठविले असून विद्यार्थिनींना चेन्नई येथे उपग्रहाबाबत प्रशिक्षणही दिले. आता या विद्यार्थिनींकडून 18 ते 22 जानेवारीपर्यंत चेन्नई, पुणे व नागपूर येथे उपग्रहांची प्रत्यक्ष जुळवणी व कोडींग केली जाणार आहे. त्यानंतर 7 फेब्रुवारीला एकाच वेळी शंभर उपग्रहांचे सायन्टीफीक हेलीयम बलून द्वारे अंतराळात प्रक्षेपण केले जाणार आहे. हे उपग्रह पृथ्वीपासून 38 हजार मीटरवर स्थापित केले जाणार आहे. त्यानंतर अंतराळातून पृथ्वीवर स्थापित केलेल्या केंद्राशी कशा प्रकारे संपर्क होतो, अंतराळातील ओझोनचा थर, कार्बन डाय-ऑक्साईड व तत्सम बाबींचा ऑनलाईन सूक्ष्म अभ्यास करण्याचा अनुभव या विद्यार्थिनींना घेता येणार आहे.

पाटणबोरीसारख्या आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थिनींना थेट उपग्रह प्रक्षेपणाचा अनुभव मिळणे ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. फाऊंडेशनचे ठाणे येथील महासचिव मिलिंद चौधरी व समन्वयक मनीषा चौधरी महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. भरीव सहभागाबद्दल डॉ. अब्दुल कलाम आझाद यांच्या 92 वर्षीय बंधूंनी आम्हाला पत्र पाठवून कौतुक केले.
– सुरेश रेड्डी , अध्यक्ष, रेड्डीज्‌ कॉन्व्हेन्ट, पाटणबोरी.