उपोषणकर्ते कलाकेंद्र चालक, कलाकारांची प्रकृती खालावली

अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाईन  – जामखेड तालुक्यातील मोहा परिसरातील कलाकेंद्रांच्या विरोधात राजकीय दबावापोटी कारवाई केली जात असल्याच्या निषेधार्थ कला केंद्र चालक व तेथील महिला कलाकारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यातील काहींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

मोहा परिसरातील कलाकेंद्रांचा विषय चांगलाच चिघळला आहे. मोहा परिसरातील कला केंद्र बंद करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी सलग सात दिवस उपोषण केले होते. प्रशासनाने चौकशी होईपर्यंत परवाने तातडीने निलंबित करण्याचा आदेश दिला. त्यामुळे सातव्या दिवशी मोहा परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे उपोषण मागे घेतले. आंदोलकांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने नमते धोरण स्वीकारून कला केंद्रांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केले होते.

दरम्यान, ग्रामस्थांचे उपोषण सुरू असतानाच राजकीय सूडापोटी कलाकारांवर अन्याय केले जात असल्याचा आरोप करीत कलाकेंद्र चालक व तेथील कलाकारांनी कलाकेंद्रांच्या बाहेरच आमरण उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. काही कलाकारांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने आता मोहा परिसरातील कला केंद्रांचा विषय चांगलाच चिघळला आहे. याबाबत प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.