‘बुरेवी’ चक्रीवादळ श्रीलंकेला धडकले ! आज रात्री तामिळनाडुत येणार, NDRF ची पथके तैनात

चेन्नई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘बुरेवी’ चक्रीवादळाने मध्यरात्री श्रीलंकेतील त्रिकोमाली किनारपट्टीला धडकले. यावेळी वार्‍याचा वेग ताशी ८० ते ९० किमी असून त्यामुळे श्रीलंकेच्या किनारी पट्ट्यावर सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. ‘बुरेवी’ हे चक्रीवादळ आज मध्यरात्री किंवा उद्या सकाळी कन्याकुमारी ते पामबन दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण तामिळनाडु, केरळमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे.

सध्या हे चक्रीवादळ कन्याकुमारीपासून ३२० किमी आणि पामबनपासून १२० किमी दूर आहे. हे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकेल, त्यावेळी वार्‍यांचा वेग ताशी ९० किमी इतका असण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफची पथके तामिळनाडु व केरळच्या किनारपट्टीच्या शहरांमध्ये नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात झाली आहे.

दक्षिण तामिळनाडुतील विविध किनारपट्टीवरील मोठ्या शहरात एकूण १४ एनडीआरएफची पथके नेमण्यात आली आहे. कन्याकुमारी येथे २ पथके नियुक्त करण्यात आले असून कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकावर जाण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे.
तामिळनाडुचे राज्यमंत्री आर बी उदयकुमार यांनी रामेश्वरम येथे भेट देऊन चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीची पाहणी केली.