कोकणाला जबरदस्त तडाखा देऊन अखेर ‘निसर्ग’ चक्रीवादळ शांत ! नारळ, आंबा, पोफळीच्या बागा उद्धवस्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेले १२ तासात जोरदार पाऊस, वार्‍यासह तांडव नृत्य केल्यानंतर निसर्ग चक्रीवादळ शांत झाले आहे. गुरुवारी सकाळी राज्यातील बहुताश ठिकाणी लख्ख ऊन पडल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्याचबरोबर कोकणात या चक्रीवादळाने केलेला विध्वस समोर येऊ लागला आहे. या वादळाचा सर्वाधिक तडाखा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला बसला असून तेथे हजारो नारळ, पोफळी, आंब्याच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. हे चक्रीवादळ दापोली तालुक्याला धडकल्याने तेथे त्याने सर्वाधिक तडाखा दिलेला दिसून येत आहे.

रायगड तालुक्यात हजारो झाडे उन्मळून पडली असून त्यामुळे अनेक गावाकडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. अनेक तालुक्यात वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. या चक्रीवादळाचा महावितरणला सर्वाधिक फटका बसला आहे. वीजे खांब पडल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वीज नसल्याने हजारो लोकांचे मोबाईल बंद झाल्याने त्यांचा इतरांशी संपर्कही तुटला आहे. भात खाचरांमध्ये पाणी साचले आहे.

या चक्रीवादळाचा दापोली, मंडणगड, मालवणला सर्वाधिक फटका बसला आहे. ताशी ९० ते १२० किमी वेगाने वाहणार्‍या वार्‍यांनी झाडे पडणे, घरावरील पत्रे उडणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडले आहेत.
महावितरणने तातडीने वीज वाहिन्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम पुण्यासह नाशिक, धुळे, नंदुरबारपर्यंत जाणवला. जोरदार वार्‍यांसह पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये झाडेपडीच्या घटना घडल्या. पुण्यात एका दिवसात ६० हून अधिक ठिकाणी झाडे पडली. झाडे पडल्याने त्याखाली सापडून अनेक दुचाकी, चारचाकी वाहनाचे नुकसान झाले आहे.