जामखेड तालुक्यात चक्रीवादळाचा तडाखा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जामखेड तालुक्यातील हळगाव, आघी परिसरांतील गावांत अवकाळी वादळी पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच वीज पडून तीन जनावरे मृत्युमुखी पडले. तहसीलदारांनी परिस्थितीची पाहणी करून महसूल विभागाच्यावतीने पंचनामे करण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, हळगाव व आघी या दोन गावांना मंगळवारी रात्री आठ ते नऊ या वेळेत वादळी पावसाचा तडाखा बसला. वादळाचे मोठे नुकसान झाले. तहसीलदार विशाल नाईकवाडे, पंचायत समितीचे गटविकासाधिकारी रूपचंद जगताप, कामगार तलाठी प्रफुल्ल साळवे, ग्रामसेवक विश्वनाथ खेंगरे, ग्रामसेवक सचिन गदादे आदींच्या पथकाने आज सकाळी हळगाव येऊन पाहणी केली.

हळगाव येथील चारा छावणीला या पथकाने भेट दिली. या छावणीतील शेतकरी शिवाजी शहाजी ढवळे यांची एक गाय व एक बैल वीज कोसळून ठार झाले होते. घटनास्थळाची महसुल पथकाने पाहणी केली. यावेळी पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार शिवाजी ढवळे यांचे तब्बल ८० हजाराचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हळगाव गावातीलच नानासाहेब लक्ष्मण ढवळे यांच्या राहत्या घरालाही वादळाचा तडाखा बसला यात घरासह घरातील भांडे व संसार उपयोगी साहित्यांचे भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. एकनाथ आश्रू तांबे या शेतकर्याच्या घरावरील १४ पत्रे उडून गेले. वादळामुळे घराची भिंत पडली असून घरासह घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

आघी गावालाही चक्रिवादळाचा जोरदार तडाखा बसला. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसात सीना ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित चारा छावणीत वीस कोसळून हनुमंत भाऊ तेरकर या शेतकऱ्याची ४० हजार रुपए किमतीची खिलारी गाय ठार झाली. तसेच आघी गावातील बोराटे वस्ती परिसरातही चक्रीवादळाने मोठे नुकसान केले. या भागातील विजेचे अनेक खांब कोसळले आहेत. या वादळात मोहन नारायण बोराटे या शेतकऱ्याच्या घरावरील ९ पत्रे उडून गेले तसेच सदाशिव सजेर्राव बोराटे यांच्या घरावरील १३ पत्रे उडून गेले. आघी गावातील नामदेव राजेंद्र गावडे या शेतकऱ्याच्या घरावरील १० पत्रे उडून गेले. बाबासाहेब पोपट इंगळे यांच्या घरावरील १० पत्रे उडून गेले.

छावणीतील जनावरे नेली घरी
वादळामुळे हळगाव व आघी या दोन गावांमधील चारा छावण्यांमध्ये वीज कोसळून तीन जनावरे दगावली. छावण्यांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले. मंगळवारी रात्री काही शेतकऱ्यानी आपली जनावरे पाऊस उघडल्यानंतर घरी नेली. चारा व पाण्याचा परिसरात ठणठणाट असल्यामुळे जीवाची पर्वा न करता काहींना जनावरांंसह छावण्यांमध्येच थांबण्याची वेळ आली आहे.