पोलिसांनी गावात सोडले नाही, दाम्पत्याकडून आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू तर पती अत्यावस्थ

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलिसांची नाकाबंदी आहे. जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर 1 येथे नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी गावात सोडण्याच्या कारणावरून वाद झाल्याने पती-पत्नीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पत्नी अनुजा रोहिदास शिंगोटे (वय-40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पती रोहिदास शिंगोटे (वय-45) अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.7) सायंकाळी घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने उंब्रज नंबर 1 हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे गावात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. रोहिदास हे पत्नी अनुजासह सकाळी भाजी विक्रीसाठी गाडी घेऊन गेले होते. सायंकाळी परत येताना गावात जाण्यावरून पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले. त्यानंतर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील आले. त्यांनी या दोघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी तेथून जाण्यास नकार दिला.

दरम्यान, पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. याचवेळी अचानक रोहिदास याने खिशातील विषारी औषधाची बाटली काढून तोंडाला लावली. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांचा हात झटकल्याने ती बाटली खाली जमिनीवर पडली. तीच बाटली पत्नी अनुजा यांनी उचलून औषध प्राशन केले. ही घटना काही मिनिटात घडल्याने उपस्थितांना धक्का बसला.

यानंतर दोघांना उपचारासाठी त्वरीत ओतूर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच अनुजाचा मृत्यू झाला तर रोहिदास यांना नारायणपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथून त्यांना पुण्यात हलवण्यात आले. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. यानंतर त्यांची समजूत काढून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी जेतेद्र डुड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी ओतुर येथे येऊन घटनेची माहिती घेतली. दरम्यान या घटनेची माहित मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील हे देखील या ठिकाणी आले.