शिर्डी : विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविताना पत्नीचाही मृत्यू, बहीण बचावली

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – पती-पत्नीत झालेल्या किरकोळ वादातून पतीने थेट घराजवळच असलेल्या विहीरीत उडी मारली. त्याला वाचवण्यासाठी त्याच्या पत्नीने व बहिणीने ही विहीरीत उडी मारली. यात पती-पत्नी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बहिणीला दोरीच्या सहाय्याने वर काढण्यात आल्याने तिचा जीव वाचला. ही घटना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायतीच्या हद्दीत शनिवारी (दि.27) रात्री अकराच्या सुमारास घडली.

या घटनेत ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय-30) आणि कविता ज्ञानेश्वर खोतकर (वय-25 दोघे रा. रेलवाडी, कोकमठाण कोपरगाव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर जनाबाई खोतकर असे वाचलेल्या बहिणीचे नाव आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी मयत ज्ञानेश्वरचे वडील तुकाराम कचरू खोतकर (वय-60) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी रविवारी सकाळी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत ज्ञानेश्वर आणि कविता यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या ज्ञानेश्वरने थेट शेतातील विहिरीकडे धाव घेतली आणि विहीरीत उडी घेतली. पतीच्या मागे आलेल्या पत्नी कवीताने पतीला वाचवण्यासाठी तिनेही विहीरीत उडी मारली. दोघे विहिरीत पडल्याचे बघून ज्ञानेश्वरची बहिण जनाबाई हिनं आरडाओरडा करत गावकऱ्यांना हाका मारल्या. त्यानंतर तिनेही भाऊ आणि वहिनीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली. सुदैवाने गावकऱ्यांनी टाकलेला दोर तिच्या हाती लागला. तिने दोर पकडल्याने तिचा जीव थोडक्यात वाचला तर ज्ञानेश्वर आणि कविता यांचा यामध्ये मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.