पत्नी जायची वारंवार माहेरी, घटस्फोटाचा निर्णय कायम ठेऊन न्यायालयाने पतीला दिला दिलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – नागपूर : एकत्र कुटुंबपद्धतीमुळे पती-पत्नीत होणारे वाद काही नवे नाहीत. त्यातून काही जण वेगळेही होतात. नागपुरातून अशीच एक घटना समोर आली आहे. पतीला न सांगता वारंवार माहेरी जाणाऱ्या पत्नीबरोबर झालेला वाद विकोपाला गेला. पतीने घटस्फोटासाठी नागपूर खंडपीठापुढे याचिका दाखल केली. त्यावर सुनावणीत पतीला न विचारता, सांगता पत्नी माहेरी जाऊन अने महिने राहत असेल, किरकोळ कारणावरून भांडण काढून पोलिसांत तक्रारी करत असेल तर ही गोष्ट पतीला मनस्ताप देणारी आहे, असे सांगत न्यायालयाने घटस्फोट योग्य ठरविला आहे.

जॉन आणि रिटा (बदलेली नावे) यांचा २४ ऑक्टोबर, २००७ रोजी विवाह झाला होता. जॉनच्या संयुक्त कुटुुंबात रिटा काही दिवस राहिली, पण तिची स्वतंत्र राहण्याची इच्छा होती. त्यामुळे ती पतीला न सांगता वारंवार माहेरी जायची. जॉनी तिला प्रत्येकवेळी सासरी परत आणत होता. दरम्यान, तिने पोलीस ठाण्यात छळाची तक्रार नोंदवली. महिला सेलच्या मध्यस्थीमुळे तो वाद मिटवण्यात आला. मुलाचा जन्म झाल्यानंतर रिटा सासरी येण्यास तयार नव्हती. जॉनने कायदेशीर नोटीस बजावल्यामुळे ती परत आली. दरम्यान संयुक्त कुटुंबात राहण्याची रिटाची इच्छा नसल्यामुळे जॉनने भाड्याचे घर घेतले होते. परंतु, तेथेही ती समाधानाने राहिली नाही. ती सतत भांडण करून जॉनला मानसिक व शारीरिक त्रास देत होती. परिणामी, जॉनने सततच्या त्रासाला कंटाळून घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली. २ मे, २०१७ रोजी ती याचिका मंजूर झाली. त्या निर्णयाविरुद्ध रिटाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. पण रिटाची वागणूक मनस्ताप देणारी असल्याचे स्पष्ट करून ते अपील फेटाळून लावले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला