Ratnagiri News : सेल्फीच्या नादात पत्नी पडली पाण्यात, तिला वाचवण्यासाठी पतीने घेतली उडी, दोघांचा मृत्यू

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या सेल्फीची क्रेझ सर्व वयोगटातील लोकांमध्ये आहे. कोठेही गेले की त्या ठिकाणी सेल्फी घेतला जातो. मात्र काही वेळा सेल्फी घेण्याच्या नादात दुर्घटना घडते आणि सेल्फी आपल्या जीवावर बेतली जाते. असाच एक प्रकार रत्नागिरीत घडला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडलेल्या बायकोला वाचवायला गेलेल्या नवऱ्याचा देखील बुडून मृत्यू झाला. गुहागरमधील हेदवे येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.अनंत माणगावकर (वय-36) आणि सुचेना अनंत माणगावकर (वय-33) अशी मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

हेदवी येथील बामणघळ ये ठिकाणी दोन्ही बाजूला उंच कडा आणि मध्येच समुद्राच्या लाटांचा अनोखा देखावा पहाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात. उंच फेसळणाऱ्या लाटांचा कड्यावर उभं राहून सेल्फी घेण्याचा मोह या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाला आवरता येत नाही. मात्र, अनेकजण अतिरेक करण्याच्या नादात खाली कोसळल्याच्या घटना अनेक वेळा याठिकाणी घडल्या आहेत.

माणगावकर दांम्पत्य आज सकाळी ठाण्याहून हेदवीच्या किनाऱ्यावर फिरायला आले होते. त्यावेळी पत्नी सेल्फी घेत असताना तिचा तोल जाऊन ती खडकात पडली आणि थेट पाण्यात वाहून गेली. पडलेल्या पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाहापुढे दोघांचेही काहीच चालले नाही आणि दोघेही पाण्यात वाहून गेले. यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघेही ठाणे येथून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. स्थानिकांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर काढले असून गुहागर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.