पाडव्याच्या दिवशीच राजगुरूनगरमध्ये थरार ; जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याचा खून

राजगुरूनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून पती-पत्नीचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना पाडव्याच्या दिवशी पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील औंढे येथे घडली आहे. दिवाळी सणादरम्यान पती-पत्नीचा खून झाल्याने परिसरासह संपुर्ण जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी सुरू केली आहे.
नावसु कुणाजी मुकणे (55) आणि लिलाबाई नावसु मुकणे (48, दोघे रा. कोहिंडे, ता. खेड) अशी खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मुकणे पती-पत्नी हे जादूटोणा करीत असल्याचा संशय काहीजणांना होता. त्यावरूनच त्यांचा खून झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुकणे दाम्पत्याचा खून झाल्याचे गुरूवारी दुपारी उघडकीस आले आहे. खून प्रकरणी कोहिंडे गावातील काही जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. काहीतरी अघोरी कृत्य करीत असल्याचा संशय घेवुन संशयितांनी मुकणे दाम्पत्याचा खून केला असल्याचा संशय वर्तविला जात आहे. गुन्हयाचा अधिक तपास पुणे ग्रामीण पोलिस करीत आहेत. दरम्यान, डबल मर्डर झाल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असुन तपासाबाबतच्या सुचना संबधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यासंदर्भात पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता मुकणे दाम्पत्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असल्याचे पोलिसांनी सांगितले.