पती-पत्नीला कोरोनामुक्त घोषित करुन केली फुलांची उधळण, नंतर घडले असे…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाबाधित दाम्पत्याचा तिसरा अहवाल येण्याआधीच रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुक्त घोषित केले. त्यांच्यावर फुलांची उधळण करत दाम्पत्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, रात्री उशिरा आलेल्या अहवालात पती-पत्नी पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे.

कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये पाथर्डी येथील पती-पत्नीचा देखील समावेश होता. त्यांच्यावर कळंब रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन दोन चाचणी घेण्यात आल्यानंतर गुरुवारी तिसर्‍या चाचणीसाठी पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. पण, दोन चाचण्याची अहवाल निगेटिव्ह आल्याचे पाहून तिसर्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच दाम्पत्याला रुग्णालय प्रशासनाकडून कोरोनामुक्त करण्याची घोषणा करण्यात आली.

दाम्पत्याला डिस्जार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांच्यावर फुलांची उधळणही करण्यात आली होती. आता महिलेच्या कोविड-19 चाचणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती. मात्र, रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे दाम्पत्याला सोडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.