पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  लग्नानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी दिघी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.4) विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील परांडे नगर येथे घडली आहे.

याप्रकरणी आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या 54 वर्षीय वडिलांनी सोमवारी (दि.5) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पती रजत संजय बोर्डे (वय-27 रा. मृणाल हॉस्पिटलच्या मागे, परांडे नगर, दिघी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 22 वर्षीय मुलगी आणि तिचा पती दोघेजण दिघी येथे राहतात. पती रजत बोर्डे याने मुलीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी तिच्या पतीवर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.