पत्नीनं चहा बनवून नाही दिला, पतीनं लोखंडी पाईपनं झोडपलं अन्…

कामशेत/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्नीने चहा बनवून दिला नाही म्हणून पतीने पत्नीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पत्नीला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पत्नीचा आठ दिवसांनी मृत्यू झाला. ही घटना मावळ तालुक्यातील लोखंडवाडी येथे घडली असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे.

उमा राजू बोल्ली (वय-39 रा. कारुंज, लोखंडवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शंकर रामा लोखंडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती राजू नारायण बोल्ली (वय-42 रा. कारुंज, लोखंडवाडी, मूळ रा. गांधीनगर, झोपडपट्टी नं.7, अक्कलकोट, जि. सोलापूर) च्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा बोल्ली या पती राजू समवेत शंकर रामा लोखंडे यांच्या पोल्ट्रीशेड जवळील एका खोलीत रहात होत्या शनिवारी (दि.1) सायंकाळी सहाच्या सुमारास राजूने उमाकडे चाहाची मागणी केल. मात्र, उमाने चहा करून देण्यास नकार दिला. उमाने चाहा करून देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या राजूने लोखंडी पाईपने उमाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली.

राजूने लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत उमाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आठ दिवस तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र शनिवारी (दि.8) तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि दुपारी एकच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याबाबत रविवारी (दि.9) पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी राजू बोल्लीला ताब्यात घेतले आहे.