‘कराटे’ चॅम्पियन पत्नीच्या मारहाणीत पती गंभीर जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडू नये यासाठी देशात कडक कायदा करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी पत्नीकडून पतीला हिंसाचाराला बळी पडावे लागते. अशीच एक घटना दिल्लीच्या एनसीआरच्या नोएडात घडली आहे. एका तरुणाचे सोशल मीडियावर कारेट चॅम्पियन मुलीसोबत प्रेम झाले. यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पत्नीने पतीला कराटेची धमकी देणे सुरु केले. शनिवारी या दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नीने एका किकमध्ये नवऱ्याच्या पायाचे हाड मोडले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण आपल्या कुटुंबासमेत सेक्टर 19 मध्ये राहतो. त्याची पत्नी कराटे चॅम्पियन आहे. या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर पत्नीला कराटेचा सराव करण्यास जमत नव्हते. रविवारी सकाळी पतीने पत्नीला घरीच सराव करण्यास सांगितले. पत्नीला सरावासाठी मदत करण्यासाठी गेलेल्या पतीला पत्नीने एक जोरात किक मारली. यामध्ये पतीच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. पतीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचार केल्यानंतर पतीला घरी सोडण्यात आले.

दरम्यान, तरुणाच्या वडिलांनी सुनेवर मारहाणीचा आरोप करत पोलिसांकडे तक्रार केली आहे. तरुणाचे वडील अशोक साहनी यांनी सांगितले की, या दोघांनी 2019 मध्ये लग्न केले. लग्न झाल्यापासून दोघांमध्ये नेहमी भांडण होत होते. सून मुलाला मारहाण करते, असा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वीही तिने मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.