बायकोचं दुसरीकडे ‘लफडं’ असल्याचे ऐकताच पतीची आत्महत्या !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – बायकोच्या गावातील मुलांनी दारू पाजून तुझ्या बायकोचे झेंगाट आहे, असे सांगितल्याने एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी बायकोच्या गावातील दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अजय नंदकुमार घाडगे आणि बालाजी ऊर्फ सोन्या अशोक येडके (दोघे रा. देवळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुरेखा दत्तू कांबळे (वय ४५, रा. आदर्शनगर, मोरया कॉलनी, मोशी) यांनी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल ते २९ जुलै २०१९ दरम्यान मोशी येथे घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ज्ञानेश्वर दत्तु कांबळे याचा विवाह झाला होता. त्याच्या पत्नीच्या गावातील अजय घाडगे व बालाजी येडके यांनी ज्ञानेश्वर याच्याशी दोस्ती केली. त्यानंतर त्याला दारू पिण्यासाठी नेले. ज्ञानेश्वर याने दारू पिल्यानंतर त्याला तुझ्या बायकोचे लफडं आहे. तू कस काय लग्न केले, असे सांगितले. यामुळे ज्ञानेश्वर याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय निर्माण झाला.

या घटनेनंतरही त्यांनी वेळोवेळी ज्ञानेश्वरला फोन करुन त्याच्या पत्नीविषयी काही बाही गोष्टी सांगितल्या. त्यामुळे मानसिक त्रास झाल्याने ज्ञानेश्वर याने २९ जुलै रोजी घरात लोखंडी अ‍ॅंगलला बायकोच्याच साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. सुरेखा कांबळे यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाशी विचार विनिमय करुन याविषयी तक्रार दिल्याने भोसरी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्य केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Visit – policenama.com 

You might also like