धक्कादायक ! तळोजामध्ये पत्नीवर चाकू हल्ला करून पतीने रेल्वेखाली जाऊन केली आत्महत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तळोजामध्ये पत्नीवर चाकू हल्ला करून पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोजा फेस १ मध्ये नीलकमल अपार्टमेंटमध्ये अर्चना दुर्गुडे आणि पती गणेश दुर्गुडे राहत होते. मात्र, सणासुदीच्या दिवशीच घरगुती कारणांवरून टोकाचा वाद झाला. गंभीर म्हणजे चाकू हल्ला करून पत्नीला ठार करण्याच्या प्रयत्नात अर्चना गंभीर जखमी झाली. शेजाऱ्यांना याची माहिती मिळताच तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अर्चना दुर्गुडे यांची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.

पत्नीवर वार केल्यानंतर आरोपी पती गणेश याने तळोजा रेल्वे ट्रॅकवर रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. तद्नंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून, तो शवविच्छेदनसाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला आहे. क्षल्लक कारणावरून वाद इतक्या टोकाला का गेला ? यासंदर्भात तळोजा पोलीस अधिक तपास करत आहेत.