पत्नीच्या हेरगिरीमुळे पतीची आत्महत्या, पुण्यातील घटनेत पत्नीसह सासू, सासर्‍यांवर FIR दाखल

0
21
Farmer
file photo

पुणे : आपल्या पतीचे लग्नाअगोदर अफेअर असल्याच्या संशय घेऊन पत्नीने त्याची हेरगिरी करुन त्याला मानसिक व शारीरीक त्रास दिला. या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा दावा मुलाच्या वडिलांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन हडपसर पोलिसांनी पत्नी व तिच्या आईवडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णानंद कन्हैय्याराम गुप्ता (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार १३ एप्रिल २०१६ मध्ये घडला होता. याप्रकरणी कन्हैय्या रामलंघन गुप्ता (वय ६०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गुप्ता यांचा मुलगा कृष्णानंद गुप्ता हा आपल्या पत्नीसह जेनिया सोसायटीत रहात होता. त्याच्या पत्नीला कृष्णानंद गुप्ता याचे लग्नाअगोदर अफेअर असल्याचा संशय होता. ते शोधून काढण्यासाठी ती हेरगिरी करीत होती. त्यातून त्याला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देत होती. तुला व तुझ्या घरच्यांना खोट्या कौटुंबिक गुन्ह्यात अडकविण्याची ती व तिचे आईवडिल धमकी देत होते. या त्रासाला कंटाळून कृष्णानंद गुप्ता याने १३ एप्रिल २०१६ रोजी आत्महत्या केली होती. याबाबत कन्हैय्या गुप्ता यांनी लष्कर न्यायालयात तक्रार दिली होती. न्यायालयाने सी़ आर पी़ सी १५६(३) प्रमाणे अहवाल सादर करण्याचा आदेश हडपसर पोलिसांना दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.