लेकीला शाळेत प्रवेश नाकारला, वीरपत्नी म्हणाली – ‘पती देशासाठी विनाकारण झाले शहीद’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – मातृभूमीच्या रक्षणासाठी लढताना आपल्या देशाचे अनेक वीर जवान शहीद होतात. त्यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जमाव एकत्र येतो. राजकीय नेते, कार्यकर्ते सगळेजण येऊन शहीद जवानाच्या कुटुंबाचे सांतवन करतात. मात्र, पुढे या शहिदांच्या कुटुंबाचे काय होते हे कुणीच पहात नाही. नांदेड जिल्ह्यातील एका शहीद जवानाच्या पत्नीला देखील असे अनुभव येत असून यामुळे ती निराश झाली आहे. या पत्नीवर हताश होऊन माझे पती विनाकारण देशासाठी शहिद झाले अशी खंत व्यक्त करण्याची वेळ आली आहे.

विरपत्नीने आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे ती मोठी अधिकारी व्हावी असे स्वप्न उराशी बाळगले. मुलीच्या शिक्षणासाठी तिने शाळेचे उंबरठे झिजवूनही तिच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे शहीद जवान संभाजी कदम यांची विरपत्नी शितल कदम यांनी पती देशासाठी विनाकारण शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी खंत एका वृत्तवाहिनीकडे व्यक्त केली आहे.

शहीद जवान संभाजी कदम यांना 6-7 वर्षाची मुलगी आहे. त्यांची पत्नी शितल कदम ही मुलीच्या शिक्षणासाठी शाळांमध्ये धडपड करत आहे. अनेक शाळांचे उंबरठे झिजवून देखील त्यांच्या मुलीला शाळेत प्रवेश मिळत नाही. ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला अपमानास्पद वागणूक देण्यात आली. अनेक पत्र घेऊन गेल्यानंतर देखील काहीही उत्तर मिळालं नाही. याचा फरक पडत नाही अशी उत्तरं शाळांकडून ऐकायला मिळाली असल्याचे वीरपत्नी शितल कमद यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान संभाजी कदम हे 2016 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये शहिद झाले.

शीतल कदम या नांदेडमधील प्रसिद्ध ज्ञानमाता विद्याविहार या इंग्रजी शाळेत मुलीला प्रवेश देण्यासाठी मागील वर्षी मार्चमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आता प्रवेश होऊ शकत नसल्याचे सांगत जानेवारी महिन्यात येण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या शाळेत गेल्या मात्र शाळा प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. शितल कदम यांनी जिल्हा सैनिक कार्यालयाकडून शिफारस घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधीत शाळेला पत्र लिहले. यामध्ये त्यांनी शीतल कदम या शहीद जवानाच्या वीरपत्नी असून त्यांच्या मुलीला विनामुल्य प्रवेश देण्यात यावा असे सांगण्यात आले होते. मात्र, शाळा प्रशासनाने याची कोणतीच दखल घेतली नाही. मुलीच्या शिक्षणासाठी आपण शाळेचे डोनेशन देण्यास तयार असल्याचे शितल कदम यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यांना शाळेच्या संचालकांना भेटू दिले जात नाही. तसेच या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शाळेवर कारवाई करावी : वीरपत्नी शीतल कदम
शीतल कदम यांनी सांगितले की, आपण शहीद जवानाची पत्नी असल्याचे त्यांना सांगितले परंतु त्यांनी याची दखल घेतली नाही. तुम्ही चालते व्हा असे सांगण्यात आले. हताश झालेल्या शीतल कदम यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. ते असते तर आम्ही कसंतरी जगलो असतो. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले अशी निराजनक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे याप्रकरणावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन वीरपत्नीला न्याय मिळवून देणार का ? तसेच वीर जवानाच्या मुलीला प्रवेश नाकरणाऱ्या शाळेवर कोणती कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा