पतीकडून पत्नी आणि एक वर्षाच्या मुलाचा खून

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह एका वर्षाच्या मुलाचा विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करुन पतिने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

राजेश श्रीमंगले असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पत्नी अलका हिच्यावर संशय होता. या संशयामुळे त्याने काल (रविवारी) रात्री आठच्या सुमाराला अलका आणि एक वर्षाचा मुलगा रुपेश या दोघांना एका शेतातील विहीरीमध्ये ढकलून देत त्यांचा खून केला. त्यानंतर राजेशने स्वतः ठाण्यात हजर होऊन केलेल्या कृत्याची माहिती दिली.

याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून विहिरीतून मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यांपैकी पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले असून मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून रविवारी रात्री अकरा वाजल्यापासून मृतदेहांचा शोध सुरु केला होता. रात्री उशीरा पत्नीचा मृतदेह सापडला. आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले. मात्र, मुलाचा मृतदेह पोलिसांना सापडला नाही. पुढील तपास अर्धापुर पोलीस करीत आहेत.