त्यानं तलवारीनं बायकोचा गळा चिरला अन गाठलं पोलिस स्टेशन; पत्नीच्या चारित्र्यावर होता दाट संशय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीचा तलवारीने गळा चिरून हत्या केली आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये रविवारी (दि. 9) रात्री उशीरा ही धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला अन् पत्नीच्या हत्येची माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे हे दुसरे लग्न होते. पहिल्या पत्नीपासून आरोपीला एक मुलगा आहे. पण दुसऱ्या पत्नीपासून त्याला अपत्य नव्हते. आरोपी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. रविवारीच तो पत्नीला माहेरून घेऊन आला होता. त्याच रात्री उशीरा त्याने तलवारीने पत्नीचा गळा चिरला. आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. घटनेनंतर बोरानाडा एसीपी मांगीलाल राठोड घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बेडवर पडला होता. प्राथमिक दृष्ट्या हे प्रकरण अनैतिक संबंधाचे असल्याचे सांगितले जात आहे.