पोटावर सपासप वार करून नवविवाहीतेचा खून, 5 महिन्यापुर्वी झालं होतं ‘शुभमंगल’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरातील कुंभार गल्लीत घडली आहे. आज शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी आरोपी पतीस ताब्यात घेतले आहे. निकिता आकाश पवार असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली भागात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या विवाहितेचा पतीने पोटावर धारदार शास्त्राने वार करून खून केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार घटनास्थळी पोहोचले. कुंभार गल्लीतील आकाश पवार (वय 23) याचे पाच महिने पूर्वी निकिता बरोबर लग्न झाले होते. त्याने निकिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन मध्यरात्री खून करून स्वतः हून सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला हजर झाला. या घटनेमुळे पंढरपूरात खळबळ उडाली आहे.