अकोला : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा निर्घृण खून

अकोला जहाँगिर : पोलीसनामा ऑनलाइन – चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना आज (मंगळवार) पहाटे घडली आहे. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी पतिविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

निर्मला अशोक सोनवणे (वय-55) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अशोक सोनवणे असे फरार झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.2) पहाटे पती अशोक याने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी निर्मला हिच्यासोबत वाद घातला. वाद एवढा विकोपाला गेला की संतापलेल्या अशोकने दोरीच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळला. यामध्ये पत्नी निर्मलाचा जगीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी पती पळून गेला.

मयत निर्मला आणि आरोपी हे दोघे विभक्त रहात होते. आरोपी अशोक हा बीड जिल्ह्यातील एका विट भट्टीवर मजुरी करत होता. घटनेच्या रात्रीच तो गावात आला होता. पत्नीशी वाद करुन त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करुन फरार झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलगी विवाहीत असून दोन्ही मुले कामानिमित्त बाहेरगावी असतात. घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, अकोट शहराचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, अकोट ग्रामीणचे ज्ञानोबा फड यांनी भेट दिली. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस करीत आहेत.