2 पोरांची आई असलेल्या ‘दामिनी’चं ‘राजेश’शी ‘झेंगाट’, पतीला ‘कुष्ठरोग’ झाल्याचं समजातच ‘त्याला’ संपवलं

गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तिघांना अटक

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन – पतीला झालेला कुष्ठरोग उपचार करून देखील बरा होत नसल्याने तसेच आपल्या मुलांलाही होईल या भीतीने पत्नीने आपल्या प्रियकराच्या आणि दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर अपघाताचा बनाव केला. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा अपघात नसून घातपात असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 5 च्या पथकाने पत्नी, तिचा प्रियकर आणि मुलांना अटक केली आहे.

दामोदर तुकाराम फाळके (वय-47 रा. गहुंजे ता. मावळ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर राजेश सुरेश कुरुप (वय-45 रा. गहुंजे, ता. मावळ तसेच वानवडी, पुणे), वेदांत दामोदर फाळके (वय-19), दामिनी दामोदर फाळके (वय-42) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी आरोपींची नावे आहेत. वेदांत आणि अल्पवयीन मुलगा दामिनीची मुले आहेत तर राजेश हा तिचा प्रियकर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर फाळके यांचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दामोदर यांचा मुलगा वेदांत याने तळेगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अपघाताची नोंद केली. दरम्यान, दामिनी आणि राजेश यांच्यामध्ये अनैतिक संबंध असून दामोदरचा खून कुटुंबातील व्यक्तीने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान दामिनी आणि राजेश यांचे बारा वर्षापासून संबंध होते, अशी माहिती आरोपी राजेशने दिली.

दामोदर फाळके यांना कुष्ठरोग झाला होता. त्यांच्या उपचारासाठी 12 लाख रुपये खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाले होते. तसेच कुष्ठरोग बरा होत नसल्याने मुलांलाही कुष्ठरोग होईल याची भीती दामिनीला होती. त्यामुळे तिने दामोदर इतर आरोपींच्या मदतीने खुनाचा कट रचला. 22 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास कामावरुन त्यांच्या मालकीच्या हॉटेलवर आले. जेवण करून हॉटेल बंद करुन घरी जात होते. त्यावेळी मामुर्डी गावच्या हद्दीत आरोपी राजेशने त्याच्या चारचाकी गाडीने दामोदरच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. तसेच त्याने जॅक दामोदरच्या डोक्यामध्ये मारला. त्यानंतर वेदांतने डोक्यात दगड घातला. त्यानंतर ते सर्वजण घरी आले त्यांनी दामोदरच्या गाडीचा अपघात झाल्याचा बनाव रचला. मात्र, तपासात खून असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, धनराज किरनाळे, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, वसीम शेखष दयानंद खेडकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भरत माने, धनंजय भोसले, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रह्मांदे, आशा जाधव, नागेश माळी आणि अतुल लोखंडे यांच्या पथकाने केली.

Visit : Policenama.com