प्रियकराच्या मदतीने महिला पोलीस काॅन्स्टेबलने केला पतीचा खून

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन –  पंधरा दिवसापूर्वी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावाजवळ एका रिक्षात झालेल्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला पाेलीस काॅन्स्टेबलने आपल्या खात्यातीलच सहकाऱ्यासाेबत असलेल्या विवाहबाह्य संबध उघड होऊ नये याकरिता रिक्षाचालक पतीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह 5 जणांना अटक केली आहे.

पुंडलिक पाटील (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल विकास पष्टे आणि स्नेहल पाटील, विशाल पाटील, स्वप्निल गोवारी, अविनाश भोईर असे अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील मुख्य आरोपी विकास पष्टे आणि स्नेहल पाटील हे दोघेही वसई पोलीस ठाण्यात पोलीस काॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.

मनोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 17 फेब्रुवारी रोजी ढेकाळे गावाजवळ एका रिक्षात अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह टाकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनाेळखी व्यक्तीविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. हा मृतदेह वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल स्नेहल पाटील हिचे पती पुंडलिक पाटील यांचा असल्याची माहिती उघडकीस आली. मृत पाटील याने मस्तान नाक्याचे भाडे आल्याने येतो का, असा फोन मित्राला केला होता. त्यादरम्यान मृत पाटीलच्या पत्नीचे आणि तिच्या पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलचे प्रेमप्रकरण असल्याची माहिती उघडकीस आली. याचवेळी पोलिसांनी मृत रिक्षाचालकाच्या मोबाइलवर आलेल्या कॉल रेकॉर्डच्या काही तांत्रिक बाजू तपासल्या असता महत्त्वपूर्ण धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी निवडक मोबाइलधारकांना एकत्र करून सांगितलेल्या वर्णनावरून स्केच बनवले. या स्केचच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी विकास पष्टे याच्या मुसक्या आवळल्या. मनोर पोलीस तपास करत आहेत.