क्रुरतेचा कळस ! मुलीसमोरच बापाकडून इस्त्रीच्या वायरने गळा आवळून आईचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवडमधील सांगवीमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका १० वर्षाच्या मुलीसमोरच बापाने आईचा इस्त्रीच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

वंदना जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी पुंडलिक शामराव वाघमारे (वय ३४, रा. रहाटणी मुळ लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार उत्तम महादू जाधव (वय ३६, रा. रहाटणी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दारूचे व्यसन आणि बायको मुलांना मारहाण

उत्तम जाधव याला दारू पिण्याचे व्यसन होते. तो पत्नी वंदना आणि मुलांना दारू पिऊन मारहाण करत असे. त्यावरून दोघांमध्ये नेहमीच वाद होत असत. दाम्पत्याला ओंकार (८) आणि दीपाली (१०) अशी दोन मुलं आहेत. बुधवारी रात्री उत्तम दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याने त्याने पत्नी वंदना आणि मुलांना मारहाण केली.

बायको मुलांना जेवू दिले नाही

बायको आणि मुले जेवत असताना त्याने भांडणात जेवणाचे ताटही फेकून दिले. पत्नी वंदना आणि मुलांना जेवणही करू दिले नाही. वंदनाने मुलांना झोपवले. मात्र त्यांचे भांडण सुरु असल्याने दोघांनाही झोप लागली नाही.

मुलीसमोरच इस्त्रीच्या वायरने गळा आवळला

मध्यरात्री उत्तमने इस्त्रीची वायर आणून दीपालीच्या समोरच वंदनाचा गळा आवळला आणि ज्यामुळे वंदना बेशुद्ध झाली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वंदनाला त्याने मोरीत ढकलले आणि घराच्या दरवाजाला कडी लावून तो पसार झाला. या प्रकरानंतर मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेजारी धावत पळत तेथे आहेल. त्यांनी बेशुद्धावस्थेतील वंदनाला रूग्णालयात दाखलही केलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.