पतीनं विरोध केला मसाज पार्लरमध्ये जाऊन ‘काम’ करण्यास, पत्नीनं कोयत्यानं केले सपासप ‘वार’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – पतीने मसाज पार्लरमध्ये नोकरी करण्यास विरोध केल्याने संतापलेल्या पत्नीने पतीवर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाण्यातील सावरकरनगर येथे आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पत्नी सलमाला (वय-28) अटक करण्यात आली आहे. रामबाबू यादव (वय-31 रा. सावरकरनगर, ठाणे) हे जखमीचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामबाबू आणि सलमाचा 2013 मध्ये प्रेमविवाह झाला होता. हे दोघे सावरकरनगरमध्ये खोली भाड्याने घेऊन रहात होते. त्यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. सलमा एका पार्लरमध्ये नोकरीला जात असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. मात्र, तिने पती रामबाबूचे न ऐकल्याने त्याने मुलीला आणि सलमाला सोडून काही दिवस उत्तर प्रदेशात रहायला गेला. केवळ दुकानाचे भाडे घेण्यासाठी आणि मुलीला भेटण्यासाठी महिन्यातून एकदा तो ठाण्यात येत होता.

रविवारी (दि.1) या दोघांमध्ये मसाज पार्लरमध्ये नोकरी करण्यावरून पुन्हा वाद झाले. आज (सोमवार) रामबाबू घरात झोपला असताना सकाळी सहाच्या सुमारास सलमाने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रामबाबूला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी पत्नी सलमाला अटक केली असून पुढील तपास वर्तकनगर पोलीस करीत आहेत.