संतापजनक ! पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने केले ‘हे’ नीच कृत्य

हैदराबाद : वृत्तसंस्था – माहेरी गेलेली पत्नी परत येत नाही, याच्या रागातून एकाने सासरी जाऊन आपल्या साडेतीन वर्षाच्या मेव्हणीवर पाशवी बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर त्यानेच या कृत्याची माहिती आपल्या सासूला फोन करुन पत्नी परत येत नसल्याने हे कृत्य केल्याचे सांगितले. हैदराबादच्या मैलारदेवपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

हे दोन्ही कुटुंब मुळचे बिहारचे रहिवासी आहेत. मजुरीच्या कामासाठी ते हैदराबादला आले आहेत. आरोपीचे सुमारे ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. त्याने अनेकदा तिची विनवणी केली तरी ती परत आली नाही. ती व तिचे आईवडिल हे मोलमजुरीला बाहेर पडले. त्यांनी तिच्या छोट्या बहिणीला सांभाळण्यासाठी शेजारच्याकडे दिले. काही वेळाने आरोपी त्यांच्या घरी आला. घरात कोणी नाही हे पाहिल्यावर त्याने शेजारच्याकडे चौकशी केली व या छोट्या मेव्हणीला आपल्याबरोबर घेतले. तो घरी नेहमी येत असल्याने शेजारचे लोक त्याला ओळखत होते. आपल्या साडेतीन वर्षाच्या मेव्हणीला घेऊन तो चंद्रायनगुट्टा येथील एका निर्जनस्थळी गेला. तेथे त्याने दारुच्या नशेत या मुलीवर पाशवी बलात्कार केला.

त्याची पत्नी व आईवडिल सायंकाळी परत आले. तेव्हा आपला जावई मुलीला घेऊन गेल्याचे समजले. त्यांनी दोघांची शोधाशोध सुरु केली. त्यांना घराजवळच रात्री ९ वाजता मुलगी सापडली. आरोपीनेच या मुलीला घराजवळ सोडले होते. त्यानंतर त्याने आपल्या सासूला फोन करुन पत्नी घरी परत येत नसल्याने आपण तिच्यावर हे कृत्य केल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जावयाला त्याच्या घरातून अटक केली आहे.