सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पतीच जबाबदार – सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या पतीची जामीन देण्याच्या विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार आहे, असे कारण न्यायालयाने दिले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, पत्नीला दुखापत कुटुंबातील इतर सदस्याकडून झाली असली तरी त्यासाठी पतीला जबाबदार धरले जावे. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे हे तिसरे लग्न आहे, तर महिलेचे दुसरे लग्न आहे. यापूर्वीही पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानेही पतीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता.

याबाबतची माहिती अशी की, लग्नाच्या एका वर्षानंतर 2018 मध्ये दोघांनी एका मुलाला जन्म दिला. गेल्या वर्षी जून महिन्यात महिलेने हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप करत पती, सासू- सास-याच्या विरोधात लुधियाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पतीची बाजू मांडणारे वकील कुशाग्र महाजन यांनी आरोपीला अंतरिम जामीन द्यावी, अशी मागणी केली होती. यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील बँचने म्हटले की, तुम्ही कसले व्यक्ती आहात. महिलेने आरोप केला आहे की, पती तिला गळा दाबून मारणार होता. तिचा गर्भपातही झाल्याचा आरोप आहे. आपल्या पत्नीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करता ? असे सुनावले. वकील म्हणाले की, महिलेने स्वतः आरोप केला आहे की,तिचे सासरे तिला मुलाच्या हातून मारहाण करतात. यावर सीजेआय यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, सासरमध्ये जेंव्हा एका महिलेला दुखापत किंवा इजा होते, तेंव्हा त्याची प्राथमिक जबाबदारी पतीची असते. असे म्हणत कोर्टाने व्यक्तीची जामीनाची याचिका फेटाळली आहे. याबाबत टाईम्स ऑफ इंडिया’ने वृत्त दिले आहे.