चारित्र्यावर संशय घेऊन पतीने केली पत्नीची हत्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर कु-हाडीचे घाव घालून खून केला आहे. राजस्थानातील चूरू जिल्ह्यातील दुधवाखारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपी पतीला अटक केली आहे.

या प्रकरणी मृत महिलेच्या माहेरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचा नवरा अमीलाल, दीर महेंद्र, जाऊ आणि गिरधारी नावाच्या व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधवाखारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लादडिया गावात ही घटना घडली. याप्रकरणी मृत महिलेचे वडील शिवलाल मेघवाल यांनी फिर्याद दिली आहे. शिवलाल यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे की, त्यांच्या मुलगी मुकेशचे 15 वर्षांपूर्वी अमिलालशी लग्न झाले होते. अमीलाल दिवसभर आपल्या मुलीबरोबर भांडण करत असे. यामुळे त्यांची मुलगी मुकेश 2 महिन्यांपासून माहेरी आली होती. 23 मे रोजी ती परत तिच्या सासरी गेली. 25 मे सकाळी 7 च्या सुमारास पतीने मुकेशची कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची पाहणी केली आणि एफएसएल टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले. प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या आरोपी पती अमिलालला ताब्यात घेतले आहे. दुधवाखारा सीएचसी येथील मेडिकल बोर्डाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले.