पती घरी न आल्याने GPS द्वारे घेतला शोध ; ‘ते’ दृश्य पाहून तिला बसला मोठा धक्का

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – पती आपल्याला घेण्यासाठी येणार होते. त्यामुळे पत्नी वाट पाहात होती. परंतु पहाटेपासून पतीशी संपर्क होत नसल्याने पत्नीने अखेर मोबाईलवरील जीपीएस यंत्रणेद्वारे त्यांचा शोध घेतला. परंतु ती तिथे गेली तेव्हा तिला धक्काच बसला. घोडबंदर येथे मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात कार कोसळून पतीचा मृत्यू झाला होता.

सचिन काकोडकर (वय ३७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सचिन काकोडकर हे डेन्टीस्ट टेक्निशियन म्हणून काम करत होते. ते आई-वडील पत्नी आणि ४ वर्षांच्या मुलासोबत वाघबीळ येथे राहतात.

पत्नीला आणायला जाताना काळाचा घाला

सचिन काकोडकर यांच्या पत्नी माहेरी लोकमान्यनगर येथे गेल्या होत्या. दरम्यान ते येऊर येथील काम आटोपल्यानंतर बुधवारी पहाटे त्यांना घेऊन जाणार होते. मात्र घोडबंदर येथे मुल्लाबागजवळ मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात त्यांची कार कोसळली. त्यानंतर बस आगारातील कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी सचिन यांना बाहेर काढले. त्यांना बेथनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापुर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

जीपीएसने घेतला कुटुंबियांनी शोध

सचिन पहाटे येणार होते. परंतु त्यांचा पहाटेपासून फोन लागत नसल्याने पत्नी श्वेता या चिंतेत पडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सचिन यांचा जीपएसद्वारे कारचे लोकेशन शोधून काढले. तेव्हा त्यावेळी ते मुल्लाबागजवळ आढळून आले. त्या मुल्लाबाग येथे गेल्या मात्र तेथे कारचा शोध घेताना टीएमटीचे कर्मचारी त्यांना भेटले. त्यांनी श्वेता यांना सचिनच्या कारकडे नेले. मात्र कारची अवस्था पाहून श्वेताला धक्काच बसला.

You might also like