धक्कादायक ! पतीच्या मित्राशी ‘झेंगाट’, लॉकडाऊनमध्ये भेटण्यासाठी पत्नीनं दिल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या, सासूचा मृत्यू

बाडमेर : वृत्तसंस्था – एका महिलेने लॉकडाऊनमध्ये आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांना चहातून झोपेच्या गोळ्या दिल्या. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आजारी पडले. यामध्ये महिलेच्या सासूचा मृत्यू झाल्याची खळबजनक घटना बाडमेरमध्ये घडली आहे. कुटुंबातील सर्व सदस्य एकाचवेळी आजारी पडण्याचे कारण गुलदस्त्यात होते. मात्र तीन-चार दिवसांनी कुटुंबियांना सुनेवर संशय आला आणि तिच्याकडे चौकशी केली त्यावेळी संपूर्ण रहस्य उलगडले.

घरातील सुनेचे नवऱ्याच्या मित्राशी प्रेमसंबंध होते. आपल्या प्रेमसंबंधाची कबुली महिलेने दिली. त्याला भेटण्यासाठी मी घरातील सदस्यांना चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्याचे तिने सांगितले. या झोपेच्या गोळ्यांची मुदत संपली होती आणि अति प्रमाणात गोळ्या दिल्याने सासू आजारी पडल्यानंतर निधन झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील बालोत्रा गावात कपड्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या प्रियकराच्या मदतीने सासू-सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या खायला घातल्या. त्यामुळे ते सर्व आजारी पडले. दरम्यान, तिच्या सासूचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्य उपचार घेऊन घरी परतले त्यावेळी त्यांना सुनेवर संशय आला आणि त्यांनी तिच्याकडे कसून चौकशी केली. चौकशी दरम्यान तिने आपण आपल्या प्रियकराच्या मदतीने चहातून झोपेच्या गोळ्या दिल्याची कबुली दिली.

बाडमेरचे पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, या महिलेचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. तिला मूल नाही. तिचा नवरा टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतो. तर आरोपी महिलेच्या पतीचा मित्र आहे. काही दिवसांपूर्वी या महिलेने आपल्या प्रियकराबरोबर फोन नंबरची देवाणघेवाण केली. तसेच फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे बोलणे सुरु झाले. लॉकडाऊनमुळे त्यांना भेटता येत नव्हते. मग त्या दोघांनी कट रचून कुटुंबातील सदस्यांना झोपेच्या गोळ्या खायला घातल्या.

आनंद शर्मा यांनी पुढे सांगितले की, 28 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास महिलेने नेहमीप्रमाणे घरातील लोकांना चहा बनवला. चहा पिल्यानंतर थोड्याच वेळात प्रत्येकाची तब्येत ढासळली. सर्वांना नाहाटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सासू आणि नवऱ्याची प्रकृती अधिक ढासळल्याने त्यांना जोधपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. याठिकाणी उपचारादरम्यान सासूचा मृत्यू झाला. आईच्या निधनानंतर आरोपी महिलेच्या पतीने पत्नी व प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या असून कोर्टाने त्यांना तुरुंगात पाठवले आहे.