मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाईची हुसेन दलवाई यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा पुण्यातील कोंढवा भागात मुस्लिम धर्मियांच्या विरोधात नेहमी प्रमाणे गरळ ओकली असून समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार , संसद सदस्य (राज्य सभा ) हुसेन दलवाई यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.

एकबोटे व संभाजी भिडे हे नेहमीच समाजामध्ये वितृष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात व दंगली घडवून आणतात सांगली मिरज व सातर्‍यातील वाई येथे तसेच भीमा कोरेगाव येथे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही सरकारने काहीही कारवाई केली नव्हती.

अल्पसंख्याक समाजातील एखाद्याने केवळ चुकीचे वक्तव्य केले तर त्याच्यावर कारवाईची मागणी केली जाते व कारवाईही होते शारजील उस्मानी याच्या संबंधात सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा कोणाचीही हयगय करण्याची गरज नाही परंतु न्यायाच्या बाबतीत समान दृष्टीकोन असणे अतिश्य आवश्यक आहे महाराष्ट्र सरकारने पुण्यामध्ये घडलेल्या घटनेसंबंधात कारवाई करावी, अशी मागणी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली आहे.

दरम्यान महाराष्ट्रात रोज दंगल घडविण्याचा दृष्टीने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चाललेले दिसतात परंतु महाविकास आघाडीचे सरकार बनले असल्याने काहींची अडचण झाली आहे. त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड, संभाजी सेवा संघ यासारख्या शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणार्‍या संघटनांमुळे या जातीयवाद्यांचे फारसे काही फावत नाही. या संघटनांचे कौतुक केले पाहिजे, असे दलवाई यांनी नमूद केले.