हैदराबाद एन्काऊंटरची ‘SIT’ मार्फत चौकशी

हैदराबाद : वृत्तसंस्था – हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी करण्यासाठी तेलंगण सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत हे करणार आहेत. तेलंगना सरकारसोबतच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

एसआयटीचे सदस्य एन्काऊंटरबाबत साक्षीदार कोण आहेत हे पाहणार असून उपलब्ध होणाऱ्या साक्षीदारांचा जबाब नोंदवणार आहेत. या व्यतिरिक्त एसआयटी या वादग्रस्त एन्काऊंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचीही चौकशी करेल. रविवारी हैदराबादच्या साइबराबाद पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत बलात्कार प्रकरणातील आरोपींचा एन्काऊंटर बनावटरित्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी चौकशीसाठी नेले असता या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये या चौघांना ठार करण्यात आल्याची माहिती तेलंगण पोलिसांनी दिली आहे. या एन्काऊंटरप्रकरणी अनेकांनी पोलिसांचे अभिनंदन केले असून काहींनी या एन्काऊंटरबद्दल संशय व्यक्त केला आहे.

हैदराबादमधील शासकीय रुग्णालयातील पशुवैद्यक 26 वर्षीय तरुणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. बलात्कारानंतर तिची हत्या करुन चौघांनी तिचा मृतदेह पेटवून दिला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. त्यानंतर 29 तारखेला चारही आरोपींना अटक झाली होती. या घटनेविरोधात अख्ख्या देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Visit : Policenama.com

You might also like