हैदराबाद रेप केस : एन्काऊंटर झालेल्या चारही जणांचं पुन्हा ‘पोस्टमार्टम’ करा, न्यायालयाचा आदेश

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाइन – तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामुहिक बलात्कारातील आरोपींच्या एन्काऊंटरचे गुढ आणखी वाढत चालले आहे. या एन्काऊंटरची सत्यता जाणून घेण्यासाठी चारही आरोपींच्या मृतदेहांचे पुन्हा पोस्टमार्टम करण्याचे आदेश तेलंगणा उच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, हैद्राबादच्या गांधी रूग्णालयाच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने मृतदेह जास्त काळ ठेवण्याबाबत यापूर्वीच चिंता व्यक्त केली आहे. रूग्णालय प्रशासनाने मृतदेहासबंधी लवकर योग्य ते निर्देश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी केली होती.

न्यायालयाने यापूर्वी प्रकरणाच्या सुनावणीत म्हटले होते की, एन्काऊंटर संबंधीत तथ्य जाणून घेण्यासाठी दिल्लीच्या तज्ज्ञांचे पथक पुन्हा एकदा मृतदेहांची तपासणी करेल. यासाठी रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांना मृतदेहांच्या स्थितीबाबत विचारण्यात आले आहे. आता न्यायालयाने पुन्हा मृतदेहाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींच्या एन्काऊंटरचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश, न्यायमूर्ती व्ही एस शिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा तपास आयोग स्थापन केला आहे. या आयोगात मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिश न्यायमूर्ती रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी अधिकारी कार्तिकेयन यांचा समावेश आहे. तपास आयोगाने ६ महिन्यात त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करायचा आहे.

असे केले एन्काऊंटर
ही घटना पहाटे साडेतीन वाजताची आहे. पोलीस कोठडीत असलेल्या चार आरोपींना पोलीस घटनास्थळी घेऊन गेले. पोलीसांना घटनास्थळावर जाऊन गुन्हा आरोपींच्या नजरेतून समजून घ्यायचा होता. पोलीसांनी सांगितले की, यावेळी चौघांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. अशावेळी पोलीसांना गोळ्या झाडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या चकमकीत चारही आरोपी मारले गेले. नंतर त्यांचे मृतदेह सरकारी रूग्णालयात पाठविण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/