हैदराबाद ‘गँगरेप’ आणि ‘एन्काऊंटर’ प्रकरणानंतर आठवतं ‘हे’ 15 वर्षांपुर्वीचं ‘हत्याकांड’, जाणून घ्या

नागपूर – तेलंगणातील हैद्राबादमधील महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले. पोलिसांच्या या थेट कारवाईमुळे इन्स्टंट न्याय झाल्याची भावना यामुळे व्यक्त होत आहे. दरम्यान, अश्याच प्रकारचे एक प्रकरण १५ वर्षांपूर्वी नागपुरात समोर आले होते. अक्कू यादव या गुंडाला तात्काळ शिक्षा करण्यात यावी, असा आग्रह करणाऱ्या संतप्त जमावाने चक्क न्यायालयातच त्याला ठार मारले होते. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.

जमावाकडून हत्या :
नागपूर जिल्हा न्यायालय परिसरातील इमारतीमध्ये १३ ऑगस्ट २००४ रोजी दुपारी ३ वाजता. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालय क्रमांक ७ मध्ये कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड भारत ऊर्फ अक्कू कालीचरण यादव याला संतप्त जमावाने ठार केले होते. चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून आरोपीचा खून केला होता. त्यानंतर जमावाने अक्कूचे घरदेखील जाळून टाकले होते.

१९९१ पासून गुन्हेगारीत सक्रिय असणारा अक्कू यादवने कस्तुरबानगर आणि परिसरात उच्छाद मांडला होता. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी, खंडणी वसुली अशी २६ प्रकरणे त्याच्याविरुद्ध होती. त्याच्या दहशतीमुळे बलात्कार आणि छेडखानी सारखी अनेक प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतही नव्हती. १९९९ मध्ये त्याला एक वर्षासाठी स्थानबद्धही करण्यात आले होते. मात्र तडीपार असतानाही कायदा मोडून तो गुंडागर्दी करायचा. अखेर अक्कूला ७ ऑगस्ट २००४ रोजी अटक करून, न्यायालयात हजर करण्यात आले होते. परंतु त्याचा साथीदार बिपीन बालाघाटी हा अक्कूला जेवणाच्या डब्यात चाकू देताना पकडल्या गेल्याने त्याला पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा त्याला १० ऑगस्ट रोजी न्यायालयात आणले गेले. या दिवशी जमाव त्याची हत्या करणार होता. परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त यशस्वी यादव यांच्यामुळे घटना टळली होती.

१३ ऑगस्ट रोजी अक्कूला पोलीस कर्मचारी दामोदर चौधरी आणि रवींद्र सूर्यवंशी यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले असता २५-३० पुरुष आणि १०-१२ महिलांनी त्याच्या दिशेने धाव घेतली. ‘अक्कू यादव को छोड दो, हमे उसको खतम करना है’, अशी ओरड जमाव करत होता. अक्कूला पोलिसांनी दगडी इमारतीच्या आत नेऊन चॅनल गेट बंद केले आणि न्यायालय क्रमांक ७ मध्ये नेण्यात आले होते. येथील न्यायाधीश अवकाशावर असल्याने त्याला दुसऱ्या न्यायालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच जमावाने लाकडी दार तोडून न्यायालयात घुसून त्याचा खून केला होता.

दरम्यान, न्यायालयाचे न्यायाधीश पी.एम. दुनेदार यांच्या न्यायालयात या खटल्यास सुरुवात झाली होती. मात्र त्यांची बदली झाल्याने हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाकडे आला. या खटल्यात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. ७ डिसेंबर २००४ ते ऑक्टोबर २०१२ पर्यंत तब्बल आठ वर्षे हे प्रकरण धूळ खात पडून होते.

मात्र, या घटनेनंतर अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर यांनी न्यायालयात आपला लिखित युक्तिवाद सादर केला. लोक ज्या न्यायालयात न्याय मागण्यास येतात, त्याच पवित्र न्यायमंदिरात खून करण्यात आला. हा न्यायव्यवस्थेवर हल्ला होय. न्यायव्यवस्थेत भीती निर्माण झाली पाहिजे, तसेच आरोपींना सोडल्यास जनतेचा न्यायावरील विश्वास संपुष्टात येईल.असे या युक्तवादात नमूद करण्यात आले होते. या खटल्यात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर, आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर.के. तिवारी आणि अ‍ॅड. अशोक भांगडे यांनी काम पाहिले.

याप्रकणी एकनाथ चव्हाण, उषा नारायणे, अ‍ॅड. विलास भांडे, अजय मोहोड, सुमेद करवाडे, दिलीप शेंडे, पंकज भगत यांच्यासह २१ जणांना अटक केली होती. केवळ १८ आरोपी या प्रकरणी सदर पोलीस ठाण्यात १२० (ब), १२१ (अ), १४३, १४७, १४८, ३४९, ३०२, ३५३, ३३२, ३२६, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बबनराव पोराटे यांनी करून, न्यायालयात ७ डिसेंबर २००४ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात खटला सुरू असताना अजय मोहोड, देवांगणा हुमणे आणि अंजना बोरकर यांचे निधन झाले. नंतर या प्रकरणातील सर्वांना दोषमुक्त करण्यात आले होते. त्यावेळी हे प्रकरण खूप गाजले होते. हैदराबाद एन्काऊंटर मुळे आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like