हैदराबाद रेप केस : आरोपींच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांची ‘वाह-वाह’ अन् अ‍ॅक्शनवर ‘सवाल’ देखील

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला यासाठी त्यांनी पोलिसांची शस्त्रे घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चारही आरोपी ठार झाले. यानंतर देशभरातून याबाबतच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती.

अनेकांनी सोशल मीडियावर या घटनेचा आनंद व्यक्त केला आहे तर अनेकांकडून याबाबत काही प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहेत.

शमशाबाद परिसरात मोहम्मद आरीफ, नवीन, शिवा आणि चन्नकेशवुलू या चार आरोपींनी पीडित तरुणीला गाठलं होतं. आरोपींनी तिला जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न करत चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने प्रतीकार करण्यास सुरुवात केल्याने आरोपींनी गळा आवळून तिची हत्या केली आणि नंतर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकलं. पोलिसांनी २९ नोव्हेंबरला या आरोपींना अटक केली होती.

दिल्लीमधील निर्भयाच्या आईने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. मी गेल्या सात वर्षांपासून न्याय मिळण्याची वाट पाहत आहे आणि न्यायालयात हेलपाटे मारत आहे असे मत निर्भयाच्या आईंनी यावेळी व्यक्त केले आहे.

आरोपींना ठार केल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी देखील आपला आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, दहा दिवसांच्या आतमध्ये आरोपींना मारण्यात आले, माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असे म्हणत त्यांनी तेलंगणा सरकार, पोलीस आणि सोबत उभ्या असलेल्या सर्व लोकांचे आभार मानले.

सोशल मीडियावर एक युजरने लिहिले आहे की, मला आरोपींबाबत कोणतीही सहानभूती नाही परंतु न्याय निवाडा करण्याचा हा योग्य प्रकार नाही. तेलंगणा पोलिसांनी एक लाजिरवाणी कामगिरी केली आहे.

अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणतात, ब्रेवो तेलंगणा पोलीस, माझ्याकडून तुमचे हार्दिक अभिनंदन. बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने देखील याबाबत पोलिसांना सलामी दिली आहे.

एका युजरने लिहिले की भलेही मला ट्रॉल केले जाईल परंतु न्याय मिळवण्याचा हा योग्य प्रकार नाही. आम्ही पोलिसांनी आरोपीला गोळ्या घालाव्यात अशी मागणी केली नव्हती तर देशातील महिलांना सुरक्षित करा असे सांगितले होते.

एक युजर म्हणतो आता ‘तारीख पे तारीख’ हा विषयच होणार नाही. ही सर्वांसाठी खुशखबरी आहे. तर एकाने एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना देशाचे हिरो म्हंटले आहे.

तहसील पुनावाला म्हणतात, व्यवस्थेला सुधरवण्यापेक्षा पोलीस एन्काऊंटर करत आहेत. व्यवस्था पूर्णपणे संपली आहे आणि आपण कायद्या शिवाय देशाला घेऊन चाललो आहोत.

गौरव पंथी यांनी लिहिले आहे की, जर इन्काऊंटर हाच पर्याय असेल तर, भाजपचे आमदार कुलदीप सेंगर आणि बीजेपीचे माजीमंत्री चिन्मयानंद, खासदार निहाल चंद आणि बाकीच्याचे काय ?

शिव अरुर म्हणतात, डॉक्टरांच्या परिवारातील लोक अजूनही दुःखी आहेत. त्यांनी नुकताच आपल्या मुलीचा मृतदेह पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांचा उपयोग एका चुकीच्या इन्काऊंटरला योग्य ठरवण्यासाठी केला जात आहे.

वरिष्ठ वकील करुणा नंदी यांनी लिहिले आहे की, आता कधीच कोणाला समजणार नाही की पोलिसांनी ज्यांना मारले ते निर्दोष तर नव्हते ना ? लवकर होणारी कारवाई दाखवण्यासाठी त्यांना अटक तर केली नव्हती ना ? आणि जे मूळ गुन्हेगार आहेत ते बाहेर तर नाहीत ना.

केतन नावाच्या एका युजर्स ने लिहिले आहे की, रेपिस्ट सोबत असेच केले पाहिजे, पोलिसांनीच न्याय करायला हवा. आकाश बॅनर्जी म्हणतात एन्काउंटरमागे सरकारचा हात असतो. पोलिसानी याबाबतची स्क्रिप्ट ट्विटरवरूनच उचलली होती का ? असा सवाल गौरव नावाच्या युजर्सने उपस्थित केला आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like