हैद्राबाद लोकसभा मतदारसंघ : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा विजय निश्चित ; सलग चौथ्यांदा निवडून येणार

हैद्राबाद : पोलीसनामा ऑनलाईन – हैद्राबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी विजयाच्या मार्गावर आहेत.भाजपकडून डॉ. भागवनाथ राव येथे निवडणूक लढवत आहेत. एमआयएमचे ओवेसी आणि भाजपचे भागवनाथ राव यांच्यात येथे थेट लढत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, ओवेसी यांना ५८.७२ % मते मिळाली आहेत तर भागवनाथ राव यांना २६.९८ % मते मिळाली आहेत. ओवेसी भाजप उमेदवार भागवनाथ राव यांच्यापेक्षा २ लाख ७० हजार ५६२ मतांनी पुढे आहेत. त्यामुळे ओवेसी यांचा विजय निश्चित झाला आहे.

ओवेसी येथून विजयी झाल्यास ओवेसी यांचा हा सलग चौथा विजय असेल. १९८९ पासून येथे ओवेसींचा एमआयएम पक्ष येथे विजयी होतोय.असदुद्दीन यांचे वडील सुलतान सलाहुद्दीन ओवेसी हे हैद्राबाद लोकसभा मतदारसंघातून सहा वेळेस खासदार राहिले आहेत. १९८४ पासून ते २००४ पर्यंत ते खासदार होते त्यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळेस नेतृत्व केले. आता ओवेसी चौथ्यांदा निवडून येत आहेत. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघात आतापर्यंत भाजपला एकदाही यश मिळवता आलेले नाही.