हैदराबाद पोलिसांनी केलेलं ‘एन्काऊंटर’ कायद्याला धरून नाही, उज्वल निकम म्हणाले…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हैदराबादमधील ‘दिशा रेड्डी’ बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना अखेर त्यांच्या कृत्याची साज मिळाली. पोलिसांनी एन्काऊंटर करुन त्यांचा खात्मा केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. आता या घडलेल्या एन्काऊंटरमुळे अनेक स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीही या घटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं, हे एन्काऊंटर अयोग्य होतं’ असं स्पष्ट मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.

उज्ज्वल निकम म्हटले की, ‘झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण, शेवटी ते दरोडेखोरच होते,’ असंही निकम यांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना निकम यांनी आपले मत व्यक्त केले. निकम यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त करत हे कायद्याला धरून नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. आरोपींच्या हाताला बेड्या असताना आरोपी पोलिसांच्या हातातील शस्त्र घेऊच कसे शकतात असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. निकम यांच्यासह प्रकाश आंबेडकर आणि निलम गोऱ्हे यांनीही या एन्काऊँटर कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

उज्ज्वल निकम यांच्याशिवाय प्रकाश आंबेडकर आणि निलम गोऱ्हे यांनीही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या एन्काऊंटरची चौकशी झाली पाहिजे असे मत एका वृत्तवाहिनीवर बोलताना व्यक्त केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कायद्याची प्रक्रिया आहे ती ओलांडता येत नाही. झटपट न्याय देण्याची प्रथा पोलिसांनी सुरू केली आहे. त्या पोलिसांवर कारवाई व्हायला हवी. आरोपीला अशाप्रकारे संपविता येत नाही, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करुन महिना-दोन महिन्यात हे प्रकरण संपवता आलं असतं असेही आंबेडकर म्हटले.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, या एन्काऊंटरमुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं. त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सुत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले गेले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या एन्काऊंटरमुळे अनेक प्रतिक्रिया आल्या असून सर्वसामान्य जनतेकडून मात्र हैदराबाद पोलिसांवर कौतुकाची थाप पडताना दिसत आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनीही आपले मत व्यक्त केले आहे त्या म्हणाल्या, पोलिसांनी हैदराबाद प्रकरणातील आरोपींचा खात्मा केला ते योग्यच केलं असून या प्रकरणी सुनावणी सुरु होती असे देखील त्या म्हणाल्या.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हैदराबाद प्रकरणाची चर्चा चालू होती आणि विविध ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध देखील करण्यात येत होता. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आले आहे. त्यामुळे हे ठरवून केले असल्याची प्रतिक्रिया येत आहे. असे असले तरीदेखील जे झालं ते योग्यच झालं असा मतप्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. तेलंगणा पोलिसांकडून या ४ आरोपींना घटनास्थळावर तपासासाठी नेलं होतं. त्यावेळी घटनेचा रिक्रिएशन समजून घेताना त्यातील आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे एन्काऊंटर करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असे पोलिसांनी सांगितले.