हैदराबाद रेप केस : सरकारनं पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं, एन्काऊंटरची फाईल ‘क्लोज’ करावी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी पहाटे हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणीतील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर देशभरातून पोलिसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे. त्यानंतर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन, आता पीडित मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हैदराबादमध्ये जे घडले त्यामुळे देशातील इतर पोलिसांना हिंमत मिळाली असेल. सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही फाईल बंद करा, कायद्याच्या चौकटीत ही घटना आणणे योग्य नाही.

पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळाले आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने आणि न्यायालयाने त्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. उन्नावमध्ये जे घडले तसे यापुढे व्हायला नको. आरोपींनी तुरुंगामधून सुटून बलात्कार झालेल्या पीडितेला जाळले हे कृत्य निषेधाचे आहे. अशाही भावना प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केल्या.

परंतू वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. हैदराबादमध्ये पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. देशभरातून पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतूक होत आहे.

शिवसेनेच्या नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, पोलिसांच्या ताब्यात असताना असे एन्काऊंटर होते तेव्हा पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, त्यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करण्यात यावी. सीआयडी अथवा सीबीआयकडून ही चौकशी व्हावी. अशा मार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही, आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनेवर पडदा पडावा म्हणून पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरेच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, परंतू या घटनेची चौकशी व्हायला हवी.

You might also like