मौजमजेसाठी पाकीटमारी करणारा हैदराबादी चोर गजाआड

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजा करण्यासाठी आणि मित्रांना जेवण व दारू पाजण्यासाठी पाकीटमारी करणाऱ्या हैद्राबाद येथील चोरट्याला अंबेजेगाई पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली. सचिन प्रकाश उपाध्याय (वय-१९) असे अटक करण्यात आलेल्या पाकीटमाराचे नाव आहे. सचिन हा पाकाटमारी करण्यासाठी हैद्राबाद येथून अंबाजोगाई येथे येत होता. पाकीटमारी करुन तो पुन्हा हैद्राबाद येथे जात होता.

अंबाजोगाई न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.सचिन उपाध्याय हा हैदराबाद येथून रेल्वेने परळीला येऊन त्यानंतर अंबाजोगाई बसस्थानकात प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांचे दागिने लांबवणे अशा चोऱ्या सराईतपणे करीत होता. अंबाजोगाई बसस्थानकात अशा तीन घटना घडल्या होत्या. हे तिनही गुन्हे सचिन यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अमरावती येथील व्यापारी अमित गोपाल पारिख यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

अमरावतीचे व्यापारी अमित पारिख हे ११ जानेवारीला अंबाजोगाईत नातेवाइकाला भेटून अंबाजोगाई-परळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील दहा हजार रुपये चोराने लांबवले होते. शहर पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक संशयित प्रवाशांच्या मागे फिरताना दिसून आला. लागलीच पोलिस तेजस वाहुळे यांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात आणले. आपण हैदराबादहून चोरी करण्यासाठी परळीमार्गे अंबाजोगाईला येत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. सचिन उपाध्याय हा हैदराबादहून परळीत रेल्वेने यायचा. त्यानंतर तो परळीहून अंबाजोगाईला येत असे. अंबाजोगाईत आल्यानंतर दिवसभर बसस्थानकात टेहळणी करून प्रवाशांचे पाकीट व खिशातील पैसे चोरी करायचा. त्यानंतर हैदराबादकडे रवाना व्हायचा. पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करीत आहेत.