लसीकरणासंंदर्भात कॉंग्रेसच्या ‘या’ दिग्गजाची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘माझे वय 70 पेक्षा अधिक, 10 ते 15 वर्षच शिल्लक, प्रथम तरूणांना लस द्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माझ वय हे 70 वर्षांपेक्षा अधिक असून आता आयुष्याची 10 ते 15 वर्ष शिल्लक आहेत. परंतु ज्यांच्याकडे पुढची अनेक वर्ष शिल्लक आहेत, अशा तरूणांना सर्वप्रथम ही लस द्यावी, अशी प्रतिक्रिया राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवार (दि.1) पासून प्रारंभ झाला. यादरम्यान, ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेल्या आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनाही लस दिली जात आहे. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावेळी तरूणांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. प्राथमिक माहितीनुसार, लसीकरणाच्या दुस-या टप्प्यात 27 कोटी नागरिांना लस दिली जाणार आहे. 12 हजार सरकारी रुग्णालयात लस उपलब्ध करून दिली आहे. तसेच खासगी दवाखान्यात ही लस घ्यायची असेल तर, एका लसीसाठी 250 रुपये द्यावे लागणार आहेत.