साहेबांच्या उमेदवारीने माझ्या पोटात गोळा : सुप्रिया सुळे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील माढा लोकसभा मतदारसंघ सध्या गाजत आहे. तर तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उमेदवारीचा प्रश्न असला तरी लोकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे. माढ्यातून शरद पवार यांच्या उमेदवारीवरून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर आता त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जेजुरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसीस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी त्या उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी कार्यक्रमात सर्व नेत्यांनी शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवत आहेत, अशी वक्तव्ये केली. तसंच जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठिशी राहिल, अशा शुभेच्छा दिल्या. याचा धागा पकडत सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं. आता जेजुरीकर साहेबांना बारामतीतून निवडणूक लढायला सांगून आपल्याला माढ्याला पाठवतात की काय असं वाटायला लागले आहे. त्यामुळे आपल्या पोटात गोळाच आला होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थिततांमध्ये एकच हशा पिकला होता.

आघाडीची सत्ता आल्यास सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जेजुरीच्या २५० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यावर पहिली सही करतील, अशी ग्वाही सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली.

दरम्यान, शरद पावर यांनी लोकसभा माढा मतदारसंघातून निवडणूत लढवावी, अशी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची मागणी आहे. त्यावर विचार करून सांगू, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तर येत्या दोन दिवसात आपल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत निर्णय जाहिर करू, असं शरद पवार यांनी सांगितलं होतं. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्यांच्या निर्णयाकडे केंद्रीत झाले आहे.